एटीएम कार्डची अदलाबदल करून ६७ हजार रुपयांची फसवणूक


एटीएम कार्डची अदलाबदल करून ६७ हजार रुपयांची फसवणूक 


दोन खातेदार ठरले बळी , पोलीसात गुन्हा दाखल 


कन्हान : - कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये दोन खातेदारांना गंडा घालून एका अनोळखी इसमाने तब्बल ६७,००० रुपयांची फसवणूक केली. खातेदारांची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदल करत त्यांचेच पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


विनायक गणपत ठाकरे (वय ७५, रा. पटेल नगर, कन्हान) हे एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे एसबीआय बँक, कन्हान येथे खाते असून २६ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या खात्यात ₹४८,३९८ होते. त्यांना काही आर्थिक गरज भासल्याने ते बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले.


एटीएममध्ये एक ४० वर्षीय अनोळखी इसम आधीच उपस्थित होता. विनायक ठाकरे यांनी एटीएममध्ये कार्ड टाकून दोनदा पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे निघाले नाहीत. यावेळी तो अनोळखी इसम पुढे आला आणि हिंदीत म्हणाला, "मुझे दो, मैं पैसे निकालकर देता हूँ!"


विनायक ठाकरे यांनी त्याला कार्ड दिले, मात्र त्या इसमाने चातुर्याने कार्डाची अदलाबदल केली आणि बनावट कार्ड त्यांना परत देऊन "पैसे निघत नाहीत" असे सांगितले.


पुढील दिवशी, २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी त्यांनी मोबाईल तपासला असता त्यांच्या खात्यातून ४ वेळा १०,००० रुपये असे एकूण ४०,००० रुपये काढल्याचा मेसेज दिसला.


याच वेळी बबन हरीचंद मेश्राम (वय ४२, रा. छोटी अजनी, कँन्टोन्मेंट, कामठी) हेही पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबतही तोच प्रकार घडला. त्या अनोळखी इसमाने त्यांचेही एटीएम कार्डाची अदलाबदल केली आणि त्यांच्या खात्यातून २ वेळा ₹१०,००० आणि १ वेळेस ₹७,००० असे एकूण ₹२७,००० काढून घेतले.


रविवारी (२६ जानेवारी) बँक बंद असल्याने दोन्ही पीडित सोमवारी (२७ जानेवारी) एसबीआय बँकेत चौकशीसाठी गेले असता, त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अनोळखी इसमाने कार्ड बदलून संपूर्ण फसवणूक केल्याचे समजताच त्यांनी तातडीने कन्हान पोलिस ठाण्यात धाव घेतली.


विनायक ठाकरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अप. क्र. ५९/२०२५, कलम ३१८(४) बीएनएस अंतर्गत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करत आहेत.


बँक एटीएममध्ये अशा प्रकारे कार्ड बदलून पैसे काढण्याच्या घटना सतत वाढत आहेत. ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, कोणालाही आपले एटीएम कार्ड व पिन देऊ नये आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या